नवी दिल्ली – कोरोना संसर्गाचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. खुद्द रिझर्व्ह बँकेनेच तशी माहिती दिली आहे. देशाचा विकास दर उणे ४ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांवर जाईल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. बँकेने २०२०-२१ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात हे नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात जागतिक विकास दर उणे ६ टक्क्यांवर जाण्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे पूर्ण मूल्यमापन करणे अवघड आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यात आर्थिक व्यवहार कमी झाल्याने ही घट दिसून येत आहे. नंतरच्या काळात त्यात भरपाई होऊ शकते, असेही रिझर्व बँकेने म्हटले आहे.