नवी दिल्ली – केंद्र सरकारनं देशांतर्गत विमानसेवेच्या दरात १० ते ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ ३१ मार्च किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू होईल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे.
नव्या व्यवस्थेनुसार, ४० मिनिटांहून कमी हवाई प्रवासाला किमान २,२०० रुपये द्यावे लागतील. हेच भाडे पूर्वी २००० रुपये होते. याच अवधीसाठी आता विमान कंपन्या जास्तीत जास्त ७,८०० रुपये वसूल करतील. जे भाडे पूर्वी ६००० रुपये होते. देशांतर्गत विमानांमधील जास्तीत जास्त प्रवाशांची संख्या त्यांच्या क्षमतेच्या ८० टक्केहून अधिक नसेल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचं म्हणणं आहे.
प्रवाशांना आता ४०-६० मिनिटांच्या प्रवासाला कमीत कमी २८००० रुपये आणि जास्तीत जास्त ९,८०० रुपये द्यावे लागतील. पूर्वी २,५००-७,५०० रुपये द्यावे लागत होते. एक तास किंवा त्याहून अधिक म्हणजेच ९० मिनिटांसाठी प्रवाशांना ३,३००-११,७०० रुपये द्यावे लागतील. दीड तासांहून अधिक आणि दोन तासांसाठी (९०-१२० मिनिट) आता कमीत कमी ३,९०० रुपये अदा करावे लागतील.
विमान कंपन्या याच कालावधीसाठी १३,००० रुपये वसूल करू शकतील. नव्या मर्यादेअंतर्गत दोन तास ते अडीच तासांसाठीच्या (१२०-१५० मिनिट) प्रवासासाठी आता ५,०००-१६,९०० रुपये, अडीच तासापासून तीन तासापर्यंत (१५०-१८०) ६,१००-२०,४०० रुपये तसेच तीन तास ते साडेतीन तासापर्यंत (१८०-२१० मिनिटे) प्रवाशांना ७,२००-२४,२०० रुपये अदा करावे लागतील. यापूर्वी देशांतर्गत उड्डाणासाठी जास्तीत जास्त भाडे १८,६०० रुपये होते.
गेल्या वर्षी २१ मे रोजी नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांना निर्देश दिले होते की, कंपन्या कमीत कमी ४० टक्के आसनांसाठी कमी आणि जास्त भाड्याच्या मध्यापेक्षा कमी भाडे घेतील.
उदाहरणार्थ, एखाद्या वेळेसाठी कमीत कमी भाडे ५,००० रुपये आणि जास्त भाडे १०,००० रुपये असतील, तर विमान कंपन्यांना कमीत कमी ४० टक्के आसनं ७,५०० रुपयांपेक्षा कमी दरानं उपलब्ध करावी लागतील. कंपन्यांच्या कोणत्याही विमानात एकूण क्षमतेच्या ३३ टक्क्यांहून अधिक प्रवासी नसावेत, असंही संचालनालयानं तेव्हा कंपन्यांना सांगितलं होतं.
गेल्या वर्षी जूनमध्ये मर्यादा वाढवून ४५ टक्के आणि हळूहळू ८० टक्के करण्यात आली होती. ८० टक्क्यांची मर्यादा संचालनालयानं ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे.