सटाणा – देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना बागलाणचे सुपुत्र कुलदीप जाधव शहीद झाले आहे. जम्मू काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये ते तैनात होते. या परिसरात प्रचंड थंडी असल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्यदलाने सटाणा पोलीस ठाण्याला दिली आहे. कुलदीप जाधव यांचे मुळगांव पिंगळवाडे असून लहानपणापासून ते सटाणा शहरातील भाक्षी रोड येथे वास्तव्यास होते.
आठ दिवसांपूर्वीच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याने रविवारपासून ते सुट्टी टाकून घरी येणार होते. मात्र मुलाला पाहण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कुलदीप जाधव हे चार वर्षांपासून सैन्यात कार्यरत होते. जम्मू काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये ते तैनात होते. जाधव यांच्या पश्चात आठ दिवसांचा मुलगा, पत्नी, आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
रविवारी उशिरा किंवा सोमवारी सटाणा येथे शासकीय इतमामात जाधव यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.
पालकमंत्री यांच्याकडून श्रध्दांजली
जम्मु काश्मीरच्या सीमेवर देशसेवेसाठी तैनात असलेले बागलाणचे सुपुत्र कुलदीप जाधव शहीद झाल्याची दुःखद घटना घडली आहे.कुलदीप जाधव हे गेल्या चार वर्षांपासून सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. बागलाण तालुक्यातील सटाणा शहरात वास्तव्यास असलेले मूळचे पिंगळवाडे गावचे सुपुत्र कुलदीप यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर कठोर मेहनत घेऊन ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मू काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये प्रचंड रक्त गोठविणाऱ्या थंडीत ते देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना शहीद झाले. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून राज्यशासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
छगन भुजबळ
मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य