राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरु…
मुंबई : तब्बल १०० कोटींच्या वसुलीची मागणी केल्याचा आरोप खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांनी केल्याने देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी करत भाजपसह विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास हे पद कोणाकडे जाईल ? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे तसेच याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. त्यामुळे आता देखील गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच असेल हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या पुर्वी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे सुद्धा अडचणीत आले होते. एका महिलेने त्यांच्यावर आरोप केला. पण आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेऊ नये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली. मात्र त्या महिलेने हे आरोप मागे घेतले आणि नंतर हे प्रकरण थंडावले होते. मात्र दुसऱ्या एका प्रकरणात दुसऱ्या मंत्र्याबाबत भाजपने राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केल्यामुळे अखेर ठाकरे सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला.
दरम्यान, आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपांच्या प्रकरणात काही बड्या नावांचा समावेश आहे. मोठ्या तपास यंत्रणा यासाठी काम करत आहेत. आता हे प्रकरण गृहमंत्र्यांनीच तब्बल १०० कोटींच्या वसुलीची मागणी केली, या आरोपापर्यंत येऊन तुर्त थांबले आहे. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास एक ज्येष्ठ मंत्री यात सहभागी आहे, अशी कबुली देत नामुष्की आल्या सारखे होईल, अशी भीती सरकारला वाटत आहे. तर दुसरी कडे खुद्द माजी पोलीस आयुक्त सारख्या एका जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाल्याने आता अनिल देशमुख यांनी गृहखाते योग्य पद्धतीने हाताळलं नाही हे एक प्रकारे सिद्ध झाले आहे, अशी चर्चा शासन आणि प्रशासन पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे गृहमंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे सरकार स्थापन होताना सुरुवातीला अजित पवार यांची गृहमंत्री मिळावे अशी अपेक्षा होती, गृहखातं आपल्याला मिळेल. पण तेव्हा त्यांना ते मिळाले नाही , म्हणून ते आता हे पद स्विकारणार नाहीत, असे म्हटले जाते. तसेच सध्या वेगळी परिस्थिती असताना या पदासाठी स्पर्धा कोणी करणार नाही. असे दिसत असताना गृहमंत्रिपदासाठी रस्सीखेच आहे हे देखील वास्तव आहे. कारण महाविकास आघाडीसाठी सध्याच्या घडीला गृह खाते हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अनेक प्रकरणांच्या अनेक चौकशा आणि तपास सुरू आहेत. त्यामुळे गृहखात्याची जबाबादारी योग्य व्यक्तीकडे देण्याचे आव्हानही आहे. त्यामुळे गृहखात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पर्धा असून गटबाजी सुद्धा आहे. त्यामुळे जर देशमुख यांचा राजीनामा घेतला तर शरद पवार गृहखाते कोणाकडे देतात याची सर्वांनाच उत्सुकता असल्याने या पदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.