नवी दिल्ली ः केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शेतक-यांनी आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संयुक्त किसान मोर्चातर्फे येत्या ६ फेब्रुवारीला दुपारी बारा ते तीन दरम्यान देशभरात चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान देशातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग बंद राहतील.
संयुक्त किसान मोर्चातर्फे सोमवारी कुंडली सीमेवर बैठक झाली. त्यात पुढील रणनीतीवर चर्चा झाली. शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल, योगेंद्र यादव, डॉ. दर्शनपाल, गुरनाम सिंह चढ्ढूनी, प्रेमसिंह भंगू, परमेंद्र मान आदी नेत्यांनी चक्का जामची घोषणा करत केंद्रावर टीका केली. आंदोलनातील शेतकरी नेत्यांचे आणि संघटनेचे ट्विटर अकाउंट बंद केल्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचं संघटनेनं सांगितलं. आंदोलन स्थळावरील पाणी, वीज, इंटरनेटसेवा कापली जात असून, स्वच्छतागृहांची संख्याही घटवली जात असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. आंदोलन दडपण्यासाठी येण्या-जाण्याचे रस्ते बंद केले जात असल्याचं नेत्यांचं म्हणणे आहे. युवक आंदोलकांना मारहाण केली जात आहे. २६ जानेवारीला वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याबाबत काहीही माहिती दिली जात नाही. सरकार मुख्य रस्त्यांसह गल्लीतले रस्ते खोदून रस्ते बंद करत आहे. या वातावरणात सरकारसोबत चर्चा करण्याचं औचित्य राहात नाही, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
१२२ लोक ताब्यात
ट्रॅक्टर परेड झाल्यानंतर आतापर्यंत अनेक लोक बेपत्ता आहेत. अधिकृत माहितीनुसार, विविध पोलिस ठाण्यात १२२ लोक असून, ४३ लोक कारागृहात असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.
कृषी क्षेत्रासाठी वेगळा अर्थसंकल्प हवा ः टिकेत
कृषी क्षेत्रासाठी वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची तसंच कृषी कर्जे माफ करण्याची मागणी उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन करत असलेले भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी केली. एमएसपीची हमी देण्याबरोबरच शेतक-यांना मोफत वीज देण्याची योजना सरकारनं आणली पाहिजे. त्यानंतरच धरणे आंदोलन मागे घेतले जाईल, असं ते म्हणाले.