नाशिक – विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गोदावरीचे प्रदूषण रोकण्यासाठी राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा स्तुत्य उपक्रम असून नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले आहे.
गेल्या दहा वर्षे हा कार्यक्रम नाशिककरांचे प्रबोधन करून प्रदूषण मुक्तीकडे झुकत आहे हे या उपक्रमाचे यश असल्याचेही ते म्हणाले. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्याथी कृती समितीच्या वतीने फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे, सॅनिटायझर देण्यात येत आहे. या ‘फेस शिल्ड’चे प्रकाशन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. देव द्या, देवपण घ्या हा फक्त उपक्रम राहिला नसून गोदावरीच्या रक्षणासाठी ती एक प्रशंसनीय चळवळ झाल्याचे देखील विनायकदादा पाटील यावेळी म्हणाले.
या फेस शिल्डवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे नाव व महिती ठळकपणे दिसून येते. यावेळी नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.नितीन ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनीही मार्गदर्शन केले.
विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार अॅड.नितीन ठाकरे यांनी यावेळी बोलतांना काढले.
प्रास्ताविकात विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची महिती दिली. यावेळी विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, तुषार गायकवाड, राहुल मकवाना, योगेश निमसे, संदीप अहिरे, संकेत निमसे, अविनाश बरबडे, शुभम पगार, भावेश पवार, निशिकांत मोगल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
—
चोपडा लॉन्स येथे सुविधा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमात स्वयंसेवक सोशल डिस्टक्शनचे सर्व नियम पाळून दि.१ सप्टेंबर २०२० रोजी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून मूर्ती स्विकारण्यासाठी विद्यार्थी कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून गणेश भक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आकाश पगार यांनी दिली आहे.