वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (३० नोव्हेंबर) रोजी देव दिवाळी सणासाठी श्री क्षेत्र काशी (वाराणसी) येथे दाखल होत आहेत. मोदी हे याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. सुमारे सहा तासांच्या दौऱ्यात मोदी विविध स्थळांना भेटी देणार आहेत.
दौऱ्यात मोदी हे काशीतील नदीच्या घाटावर आयोजित दीपोत्सवात सहभागी होणार आहेत. तसेच श्रीकाशी विश्वनाथ कॉरिडोरच्या निर्मिती कामाचा देखील आढावा घेणार आहेत. सध्या उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला या दौऱ्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांचे दुपारी २.३० वाजता वाराणसी येथे आगमन होईल. त्यानंतर ते सांयकाळी व रात्री नियोजित कार्यक्रमात सहभाग घेतील. सहा पदरी महामार्गाचे (एनएच १९) लोकार्पण ते करतील. श्रीकाशी विश्वनाथ कॉरिडोरजवळील जाऊन ते अर्धा तास कामाची पाहणी करतील. त्यानंतर येथील घाटावर जाऊन दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहातील. सारनाथ येथील लाईट अँड शो पाहून मोदी हे विमानतळाकडे रवाना होणार आहेत. या सर्व दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून काही ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात येत आहेत.