इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘दैव तारी त्याला कोण मारी?’ अशी मराठीत एक म्हण आहे. दैव बलवत्तर असेल तर मृत व्यक्ती ही पुन्हा जिवंत होऊ शकते, असे म्हटले जाते. जणू काही याचा प्रत्यय जम्मू कश्मीरमध्ये आला. एका नवजात बालिकेला दफन केल्यानंतर काही तासांनी पुन्हा तिला बाहेर काढले असतात ते जिवंत आढळून आली, या घटनेबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु यामध्ये रुग्णालयाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे म्हटले जाते.
जम्मू-काश्मीरमधील बनिहाल येथील रुग्णालयात जन्मानंतर लगेचच एका बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जड अंत:करणाने कुटुंबीयांनी मुलीला ताब्यात दिले. अंत्यसंस्कारानंतर सुमारे एक तासाने मुलीला बाहेर काढले असता ती जिवंत बाहेर आली. प्राथमिक उपचारानंतर मुलीला तातडीने श्रीनगरला रेफर करण्यात आले. दरम्यान, रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत कुटुंबीयांनी आंदोलन सुरू केले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून रुग्णालय प्रशासनाने लेबर रूममध्ये तैनात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी सरपंच मंजूर एलिस वाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबन जिल्ह्यातील बनिहाल शहरातील रहिवासी असलेल्या शमीमा बेगम यांची सोमवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात सामान्य प्रसूती झाली. शमीमा बेगमचे पती बशारत अहमद गुजर यांच्या म्हणण्यानुसार, बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलने तिला मृत घोषित केले. सुमारे दोन तास ही मुलगी रुग्णालयातच होती. दरम्यान, गोंधळलेल्या कुटुंबाने मुलाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. तसेच कुटुंबीयांनी रुग्णालयाजवळील होलन गावात मुलीला पुरले आणि परत जायला सुरुवात केली. दरम्यान, स्थानिक नागरिक तेथे जमा झाले आणि त्यांनी मुलीला तेथे दफन करण्याऐवजी कुटुंबाच्या मूळ गावातील स्मशानभूमीत दफन करण्याचा आग्रह धरला.
सुमारे तासाभरात वादानंतर कुटुंबीयांनी मुलीला कबरीतून बाहेर काढून तिच्या मूळ गावातील स्मशानभूमीत दफन करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी कबर खणताच मुलगी जिवंत असल्याने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कुटुंबीयांनी तात्काळ मुलाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर मुलीला श्रीनगरला दाखल करण्यात आले.
डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी दुर्लक्ष व निष्काळजी करत असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. या प्रकरणाची दखल घेत बनिहाल ब्लॉक मेडिकल ऑफिसर (बीएमओ) डॉ. राबिया खान यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच खान म्हणाले की, स्त्रीरोग विभागात काम करणाऱ्या एका ज्युनिअर स्टाफ नर्स आणि सफाई कामगाराला आम्ही तत्काळ निलंबित केले असून पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत.