छतरा (झारखंड) – देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणेच अनुभव सिटू यादव यांना आला. त्यांच्या पत्नीने स्वतःच्याच दोन मुलींना (सोनी कुमारी आणि गोली कुमारी अनुक्रमे दीड आणि तीन वर्षे), विहिरीत टाकले होते. यातील सोनी कुमारी हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले, पण कुटुंबियांनी हार मानली नाही आणि उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन फिरले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले, आणि ही मृत घोषित केलेली सोनी कुमारी अचानक जिवंत झाली.
स्वतः आईनेच विहिरीत टाकलेल्या या मुलींना गावकऱ्यांनी तातडीने बाहेर काढले. आणि शेजारच्या पांडेयपुरा गावातील डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यांनी छोट्या मुलीचा मृत्यू झाल्याचे, तर गोली कुमारीची तब्येत चिंताजनक असल्याचे सांगितले. पण कुटुंबियांनी त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा ते बिहार येथील गया जिल्ह्यातील शेरघाटी येथील रुग्णायलात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. अखेर अनुग्रह नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी ती कोमात आहे असे समजून तिच्यावर उपचार केले. इथे चार दिवस अतिदक्षता विभागात ठेवल्यावर चौथ्या दिवशी सोनी कुमारी शुद्धीवर आली, आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.