देवळा : वासोळ येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मंगळवार (दि.१६) रोजी तालुक्यातील वासोळ येथे रामदास सखाराम गवळी यांच्याकडे वीज बिलाची थकीत रक्कम असल्याने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गोरख निकम व नितीन पवार हे वसुलीसाठी गेले असता गवळी यांनी विज बिल भरण्यास नकार दिला. तसेच सदर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. निकम यांनी शिवीगाळ करू नको असे सांगितले असता रामदास गवळी, अनिल गवळी, गोरख गवळी, घरातील इतर महिला व पुरुषांनी निकम यांच्यासह पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे अधिक तपास करीत आहेत. दिवसेंदिवस वीज वसुली करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!