सभापती केदा आहेर यांचा इशारा
देवळा : देवळा शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतमाल खरेदी, विक्रीसाठी येणाऱ्या घटकांनी नियमावलीचे काटेकोर पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सभापती केदा आहेर यांनी दिला.
देवळा बाजार समिती मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे खरेदी विक्री केली जाते त्यामुळे तेथे गर्दी होऊन शारीरिक अंतर राखले जात नाही त्यासाठी बाजार समितीने संलग्न असलेल्या सर्व घटकांसाठी पुढीलप्रमाणे नियमावली जाहीर केली आहे. देवळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे आवारात प्रत्येक व्यक्तीने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे अनिवार्य केलेले असुन आवारात धुम्रपान करणेस सक्त मनाई करण्यात आली, सर्दी,ताप, खोकला असलेल्या तसेच आजारी व्यक्तीने बाजार समितीत शेतीमाल विक्रीस अथवा इतर कोणत्याही कारणास्तव प्रवेश करु नये. तसे आढ़ळुन आल्यास तात्काळ आरोग्य विभागास कळविण्यात येईल, बाजार समितीशी अथवा बाजार घटकांशी संबंधित नसलेल्या व्यक्ती अथवा त्यांचे वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
अनाधिकृतरित्या आवारात आल्यास अथवा वाहन पार्किंग केल्यास त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला कळविण्यात येईल, शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीसाठी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये. ज्या दिवशी लिलाव असेल त्या दिवशी सकाळनंतर आवारात यावे, शेतकरी बांधवांनी बाजार समितीत आल्यानंतर वाहनामध्ये किमान ३ ते ५ फुट अंतर सोडावेत व आप-आपल्या वाहनाजवळच थांबावे, ज्या वाहनाचा लिलाव सुरु असेल त्या शेतक-यानेच वाहनाजवळ थांबावे. इतरांनी गर्दी करु नये किंवा समुह करुन बसु नये, सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, त्याचप्रमाणे सर्व बाजार घटकांनी शासनाकडून व स्थानिक प्रशासनाकडून कोरोना महामारी संदर्भात वेळोवेळी निर्गमित होणा-या सुचनांचे स्वयंस्फुर्तीने काटेकोर पालन करावे व बाजार समितीस सहकार्य करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे निर्देश सभापती केदा आहेर, उपसभापती संजय चंदन, सचिव माणिक निकम यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहेत.