देवळा : बनावट दस्तऐवज प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात बापू रामचंद्र वाघ, मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेशी येथील जमीन खरेदीप्रकरणी जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तपासकामात अडथळा येऊ नये म्हणून १० फेब्रुवारी रोजी देवळा येथील दुय्यम निबंधकांचा पदभार काढून घेतला होता. त्यानंतर संबधीतावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रभारी दुय्यम निबंधक माधव महाले यांनी फिर्याद दिली. त्यानंतर हे गुन्हे दाखल झाले आहे.
या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, देवळा येथील अभिलेख कक्षातून मुद्रांक विक्रेता चंद्रकांत वाघ याने दुय्यम निबंधक कार्यालय येथून अधिकारी व कर्मचारी यांच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन विश्वास संपादन केला. त्यांची नजर चुकवून दस्त क्र १७८७/२०१२ ची झेरॉक्स कॉपी कार्यालयाचे अभिलेख कक्षातून मालमत्ता हस्तांतरित करता यावी या उद्देशाने काढून घेतली. त्यातील मजकुराशी छेडछाड करून बनावट दस्तऐवज तयार केला. नंतर तो दुय्यम निबंधक कार्यालय देवळा येथील अभिलेख कक्षात परत ठेवून दिला. त्यानंतर बापू रामचंद्र वाघ यास अर्ज लिहून देऊन बनावट दस्तऐवज असल्याचे माहीत असतांनाही मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू वाघ याने मेशी (ता. देवळा) शिवारातील मिळकत ४००/१ क्षेत्र तीन हेक्टर ५० आर क्षेत्र हे बापू रामचंद्र वाघ याच्या नावे फेरफार नोंदी करून शासनाची तसेच मूळ जमीन मालक भास्कर धर्मा निकम ( रा.तीसगाव ता.देवळा) यांची फसवणूक केली.
सदर फिर्यादीवरून देवळा पोलिसात फसवणुकीसह ४०६,४६७, ४६८,४७१, ३४ तसेच भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे करीत आहेत.