देवळा : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बनावट मुद्रांक प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. परंतु, पोलीस तपासात महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आक्षेपार्ह मुद्यांद्वारे तपास करावा अशी मागणी केली आहे.
शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते उदयकुमार आहेर यांनी देवळा तालुक्यातील बनावट मुद्रांक प्रकरणातील तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आक्षेपार्ह मुद्यांद्वारे पुढील तपास करावा यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन दिले.
निवेदनात तक्रारदार शेतकरी भास्कर निकम रा. तिसगांव, ता. देवळा जि.नाशिक यांनी सदरचा प्रकार लक्षात येताच २८ जानेवारी रोजी लेखी फिर्याद देवळा पोलिस स्टेशनला दिली. मात्र सदरची फिर्याद नोंदवून घेण्यास देवळा पोलिस स्टेशनने नकार दिला. त्यानंतर प्रसार माध्यमांनी दबाव वाढविल्यावर देवळा पोलिस स्टेशनने सदरची फिर्याद १ फेब्रुवारी रोजी दप्तरी घेत पोहोच दिली. संशयित आरोपी तथा स्टॅम्प वेंडर चंद्रकांत उर्फ गोटू वाघ याला पोलिस स्टेशनला बोलविण्यात आले. त्याचे दप्तर जप्त करून त्याला संबंध दिवस बसवून ठेवण्यात आले. याच काळात आरोपीने देवळ्यातील एका बड्या व्यक्तीस फोन करून पैशांची उपलब्धता करणेस सांगितले. सदर व्यक्तीने पैसे उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतरही गोटू बरेच दिवस देवळा येथे स्टॅम्प वेंडर म्हणून कार्यरत होता. मात्र प्रकरण दखलपात्र गुन्हा असूनही त्यास अटक का करण्यात आली नाही ? भास्कर निकम यांची फिर्याद एफ.आर.आय. म्हणून आज पर्यंत नोंदवून घेण्यात आलेली नाही किंवा त्यातील तक्रारींचा तपास व अपेक्षीत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.
सदर प्रकरणात दुय्यम निबंधक देवळा यांनी ३ फेब्रुवारी रोजी देवळा पोलिस स्टेशनला सरकारतर्फे फिर्याद नोंदविली मात्र सरकारी अधिकाऱ्याने फिर्याद नोंदवूनही सदर प्रकरणात १० दिवसानंतर म्हणजेच १३ फेब्रुवारी रोजी एफ.आर.आय. दाखल करण्यात आली आहे. सरकार तर्फे फिर्याद दाखल होऊनही देवळा पोलिस स्टेशनने एफ.आय.आर. दाखल करण्यास तब्बल दहा दिवस उशिर का केला ? सदरचे प्रकरण हे बनावट मुद्रांक तयार करून जमिन खरेदी विक्री करणे असे आहे. मात्र संबंधित आरोपीवर फक्त बनावट दस्त तयार करण्याचीच कलमे का लावण्यात आली आहेत ? संबंधित आरोपींवर शासनास हानी पोहचविण्याच्या बनावट मुद्रांक तयार करणे, त्यावर दस्त बनवून शासनाची फसवणूक करणे हा आरोप का लावण्यात आला नाही ? देवळा पोलिस स्टेशनचे २८ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंतचे सीसीटिव्ही फुटेज तपासात घ्यावेत, संशयित चंद्रकांत उर्फ गोटू वाघ याचे मोबाईल कॉल डिटेल्स चेक करण्यात यावेत. त्याला पैसे उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीचे मदत करण्यात नेमके काय हितसंबंध आहेत याची कडक चौकशी संशयिताकडे करण्यात यावी व त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, भास्कर निकम यांच्या अर्जातील सर्व मुद्यांचा व आरोपींचाही सदर गुन्ह्यात समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आबा आहेर, कॉंग्रेस (आय )चे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुनिल पवार, प्रहार शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख मनोज अहिरराव, शिवसंग्राम जिल्हा उपाध्यक्ष अतूल आहेर, तालुका शेतकी संघ चेअरमन चिंतामण आहेर, संचालक अमोल आहेर, आरपीआय. तालुकाध्यक्ष कैलास पवार, ग्राहक मंच तालुकाध्यक्ष संजय मांडगे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष संतोष शिंदे, जेष्ठ नेते बाळासाहेब मगर, सुवर्णकार समाजाचे नेते मनोज अहिरराव व पीडित शेतकरी भास्कर निकम आदी उपस्थित होते.