देवळा : देवळा तालुक्यातील बनावट मुद्रांकाद्वारे जमीन खरेदीच्या प्रकरणातील दस्त सत्यप्रत करून देणारे दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे पाठोपाठ महिन्याभरापासून फरार असलेला संशयित आरोपी बापू रामचंद्र वाघ याला बुधवार ( दि. १० ) रोजी देवळा पोलिसांनी अटक केली असून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
८ फेब्रुवारीला एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले होते. देवळा दुय्यम निबंधक कार्यलयाची त्रिसदस्यीय पथकाद्वारे चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत देवळा येथील प्रभारी दुय्यम निबंधक माधव यशवंत महाले यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर देवळा पोलिसात मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ ( रा.गिरणारे ता.देवळा) व फेरफार नोंद करून जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापू रामचंद्र वाघ( रा.झाडी ता.मालेगाव) यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तपासकामात अडथळा येऊ नये म्हणून ९ फेब्रुवारीलाच दुय्यम निबंधकांचा पदभार काढून घेण्यात आला होता. चौकशी पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केली होती. बनावट दस्ताची सत्यप्रत करून देणारे तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निलंबित केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले होते. त्यानुसार सोमवार ( दि. ८ ) रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून गांगोडे यांना इतर आरोपींप्रमाणे फरार होण्याअगोदर अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर दोनच दिवसात बनावट खरेदी प्रकरणातील खरेदीदार बापू वाघ (रा. झाडी. ता. मालेगाव ) यास बुधवारी अटक केली असून गुरुवारी कळवण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.