देवळा : देवळा तालुक्यातील बनावट मुद्रांकाद्वारे जमीन खरेदीच्या प्रकरणातील संशयित आरोपी मुद्रांक विक्रेता व जमीन खरेदी करणारा इसम गेल्या काही दिवसांपासून फरार असतांना जिल्हाधिकारी डॉ सूरज मांढरे यांनी दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आज (दि.८) रोजी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
बनावट दस्ताची सत्यप्रत करून देणारे तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निलंबित केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले होते.
८ फेब्रुवारीला एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले होते. त्यानंतर देवळा दुय्यम निबंधक कार्यलयाची त्रिसदस्यीय पथकाद्वारे चौकशी करण्यात आली तसेच तपासकामात अडथळा येऊ नये म्हणून ९ फेब्रुवारीलाच दुय्यम निबंधकांचा पदभार काढून घेण्यात आला होता. चौकशी पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केली होती. आता अखेर बनावट दस्ताची सत्यप्रत करून देणे दुय्यम निबंधकाना चांगलेच भोवले असून बनावट दस्ताची सत्यप्रत करून देणारे तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निलंबित केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांना दिले होते. त्यानुसार सोमवार ( दि. ८ ) रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून गांगोडे यांना इतर आरोपींप्रमाणे फरार होण्याअगोदर अटक केली व न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कठोडी देण्यात आली. गांगोडे यांच्या अटकेमुळे पोलीस तपासात अजूनही अनेक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.