देवळा : मेशी येथे आज दि. २३ पहाटे ३ वाजेच्या सुमारास बिबट्याने गाईचा फडशा पाडला असुन तालुक्यातील भऊर येथे देखील राजहंस पक्ष्याची शिकार केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेशी येथील ज्ञानेश्वर नामदेव बोरसे यांच्या शेतातील गट नंबर. ३२३ या ठिकाणी घराशेजारील गोठ्यात गायी बांधल्या होत्या. पहाटेच्या ३ वाजेच्या सुमारास मेशी येथे अवकाळी पाऊसास सुरुवात झाली त्यातच बिबट्याने संधी साधून २ वर्षाच्या गाईचा फडशा पाडला. सदर घटनेची माहिती मेशीचे माजी सरपंच बापुसाहेब जाधव यांनी वनविभागाला दिली असता वनविभागा मार्फत वनरक्षक वंदना खरात, ताराचंद देवरे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. ६ महिन्यात मेशी, दहिवड, डोंगरगाव या ठिकाणी जवळपास बिबट्याने ३० च्या पुढे जनावरांचा फडशा पाडला आहे, पण बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप तरी अपयश आले आहे.
तर दुसऱ्या घटनेत भऊर येथील विनोद भाऊराव पवार यांच्या घरासमोर अंगणात रात्री बिबट्याने राजहंस या पक्षावर हल्ला करत त्याला ठार केले. या परिसरात देखील वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.