देवळा : शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जनतेसह आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे नियम पाळले जात नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासन यंत्रणेमार्फत कारवाईचा इशारा दिला जात आहे. मात्र कडक कारवाई केली जात नसल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. शहरासह तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. देवळा तालुक्यात आज रोजी कोरोना बाधित १२८ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १२५९ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून यापैकी ११०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. सत्तावीस रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. देवळा शहरात तसेच दहिवड, उमराणे, मेशी, लोहोणेर, खामखेडा या मोठ्या गावातील बाजारपेठेत ग्रामीण भागातून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. बाजारपेठेत शारीरिक अंतराचा संपूर्ण फज्जा उडालेला दिसून येतो. तोंडाला मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे अशा बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई न करता फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी जोर धरत आहे.
तालुक्यातील गाव निहाय रुग्ण संख्या :
देवळा ३२, मेशी २९, कनकापूर ७, लोहोणेर १३ गुंजाळ नगर ६, सरस्वतीवाडी २, खुंटेवाडी २, रामेश्वर २, झिरेपिंपळे ३, खामखेडा १, कापशी १, सांगवी १, मटाणे २, वासोळ २, उमराणे ६, वाखारी ५, वाखारवाडी २, खालप २, दहिवड ६, खडकतळे ३, विठेवाडी १ रुग्ण सद्यस्थितीत उपचार घेत आहेत.
प्रशासनाला सहकार्य करावे
तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक गरज असली तरच घराबाहेर पडावे, नियमित मास्क वापरावे, शारीरिक अंतर राखावे व स्वतःबरोबरच कुटुंबाची तसेच समाजाचीही काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या पाहता आदिवासी मुलांचे वस्तीगृह, खर्डा रोड, देवळा येथे कोरोना केयर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे.
डॉ. सुभाष मांडगे , तालुका आरोग्य अधिकारी, देवळा.