देवळा : तालुक्याला कोरोना चा विळखा अजूनही घट्ट होताना दिसत आहे. दहिवड येथील तब्बल ५७ नागरिक कोरोना बाधित आढळून आल्यामुळे दहिवड गाव कोरोनाचा हॉट स्पॉट बनला असून तीन दिवस जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे. यात स्थानिक नागरिकांचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. तालुक्यात करोना संसर्ग बाधित रुग्णांनी दोनशेचा पल्ला गाठला आहे. तालुक्यातील दहिवड हे गाव कोरोना चा हॉट स्पॉट ठरत असून गाव व परिसरातील ५७ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलेले असताना देखील योग्य त्या नियमांचे पालन न झाल्यामुळे कोरोनाचा विस्फोट झाला आहे. त्यासाठी गुरुवार ( दि. १८ ) ते शनिवार ( दि.२०) पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. या कालावधीत कोणीही नागरिक नियम भंग करत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कठोर कारवाई करण्यात येईल
दहिवड गाव व परिसरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा कर्फ्यु कालावधीत कुणीही नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचा भंग करतांना आढळून आला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
आदिनाथ ठाकूर, सरपंच, ग्रामपंचायत दहिवड