देवळा : मुंबई-आग्रा महामार्गावरील चिंचवे शिवारात तोतया पोलिसांनी ट्रक चालक व क्लिनरचे अपहरण करून दहा लाखाची खंडणी मागितल्याने वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिंपी यांनी तातडीने तपास चक्रे फिरवून दोन संशयितांना अटक करण्यात यश मिळवले आहे.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ( दि २ ) रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चांदवड देवळा सीमेवरील राहुड घाटाच्या पायथ्याशी चिंचवे शिवारात अब्दुल्ला फैजल सिराज अहमद ( वय २५) राहणार मालेगाव व त्याचा सहायक क्लिनर बशीर शेख रुस्तम हे दोघे भिवंडी येथून मालट्रक क्रमांक एम. एच. १२ एफ. झेड. ८२८२ वरून मालेगाव कडे जात असतांना ग्रे रंगाच्या स्कार्पिओ मधून आलेले संशयित वसीम शेख, शाबीर शेख, शाबीर अन्सारी व नाजीम कबूतर यांनी ट्रक अडवून पोलीस असल्याची बतावणी केली व चालक अब्दुल्ला अहमद व बशीर शेख याला बळजबरीने गाडीत टाकून अपहरण केले. त्यानंतर फिर्यादीच्या वडीलांकडे दोघांसह गाडी सोडण्यासाठी दहा लाख रुपयाची खंडणीसाठी मागणी केली.
याबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिंपी, खरोले, बागुल, पवार यांच्या टीम ने तातडीने कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे अधिक तपास करीत आहेत.