देवळा : किराणा व्यवसायिकांना शासकीय नियमांच्या अधीन राहून वेळेच्या संदर्भात शिथीलता देण्यात येईल. मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन होणे गरजेचे असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल आहेर यांनी केले. शहरातील जीवनावश्यक वस्तूंची आस्थापने रविवार वगळता इतर दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सशर्त पणे सुरु ठेवावी अशी मागणी देवळा किराणा असोसिएशनच्यावतीने आ. डॉ. राहुल आहेर व उपनगराध्यक्ष अतुल पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
देवळा किराणा व्यापारी असोसिएशनने निवेदनात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला प्रादुर्भाव बघता प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. मागील काळात सामान्य नागरिकांना दैनंदिन किराणा वस्तूंसाठी खूप त्रास सहन करावा लागला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशात जीवनावश्यक व अत्यावश्यक या बाबींना सूट दिलेले आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने शनिवार व रविवार संपूर्ण बंद व इतर दिवशी जीवनावश्यक आस्थापणांचा कालावधी कमी केला असल्यामुळे ग्राहकांसोबतच त्यावर आधारित इतर घटकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाने निर्धारित केलेल्या नियमावलीनुसार किराणा दुकाने रविवारी संपूर्ण बंद तर इतर दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश येवला, ज्येष्ठ पदाधिकारी अशोक सुराणा, मनोज सोनजे, नाना शिनकर, नितीन शेवाळकर, गोकुळ शेवाळकर, कैलास शेवाळकर, गिरीश गहिडे, सुनील सोनजे, ज्ञानेश्वर मेतकर आदींसह सभासद उपस्थित होते.