देवळा : उमराणे डिसीएच केंद्राचे काम उत्कृष्टपणे चालू असून स्थानिक आरोग्य प्रशासन रुग्णाची चांगल्या प्रकारे काळजी घेत असल्याचे रुग्णांशी साधलेल्या संवादात दिसून आले. भविष्यात कोविड रुग्णांना ऑक्सिजन ची कमतरता भासू नये यासाठी एक दोन दिवसात ड्युरा सिलेंडर उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
उमराणे ग्रामीण रुग्णालयातील डिसीएच केंद्राला शुक्रवारी सायंकाळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मालेगाव दौऱ्यावर असतांना अचानक भेट देत केंद्राची पहाणी केली. यावेळी केंद्रातील कामकाज बघून व रुग्णांशी संवाद साधून समाधान व्यक्त केले.
तालुक्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता उमराणे येथे ३० बेडचे डिसीएच केंद्र सुरू करण्यात आले आहे. यात वीस ऑक्सीजन बेड तर दहा स्टेप डाऊन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सकाळी चहा, नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहा, पुन्हा रात्री जेवण, पिण्यासाठी आरोची पाणी या पद्धतीने येथे रुग्णांना सुविधा देण्यात येते. ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या या केंद्राची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाचे कौतूक केले.
यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी दीपक पवार यांनी कर्मचारी कमी असून ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले. येत्या दोन तीन दिवसात ड्युरा सिलेंडर ची उपलब्धता करून देणार असल्याचे गमे यांनी सांगितले.यावेळी देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजुळ, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे आदी उपस्थित होते.
इच्छा असेल अशा व्यक्तींना योग्य ते प्रशिक्षण
डिसीएच केंद्रावर कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने नर्सिंग प्रशिक्षण झालेल्या मुली किंवा कोविड रुग्णांची सेवा करायची इच्छा असेल अशा व्यक्तींना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल तसेच सर्व सुरक्षा साधने देऊन काम करण्यास परवानगी देण्यात येईल.
सूरज मांढरे : जिल्हाधिकारी नाशिक.