नाशिक – देवळाली विधानसभा मतदार संघातील नाशिक तालुक्यातील ग्रामीण भाग व मनपातीलही शेतकऱ्यांना तहसीलदारांनी आकारी पडीक, शेतजमीन तुकडा, नवीन जुनी शर्त व कलम त्रेसस्ट विरुद्ध खरेदीकर वसुलीच्या पाठवण्यात आलेल्या नोटिसांना स्थगिती करण्याची विनंती महसुल मंत्र्यांना निवेदनाद्वारे आ. सरोज बाबुलाल आहिरे यांनी केली आहे. त्या नोटीसा शर्त भंगाच्या असल्याने दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्या कारवाईच्या दंडाची रक्कम जमिनीच्या आजच्या बाजार मूल्यांकनाच्या पन्नास टक्के आकारण्यात आलेली आहे. ती जमीन मनपा हद्दीत नवीन विकास आराखडा (पिवळा पट्टा)त असल्याने जमिनीचा बाजार मूल्यांकन लाखो रुपये आहे. सध्या शेतकरी बांधव कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाखो रुपयाच्या कर थकितीच्या नोटिसा प्राप्त झाल्याने शेतकरी वर्ग संतप्त होणे साहजिकच आहे. तेव्हा सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी हतबल झालेला आहे. तेव्हा सदर नोटीसीमधील जमिनीच्या बाजार मुल्यांकनाऐवजी सातबारा उताऱ्याचा आकारणी नुसार दंड वसूल करावा असे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशीत करून नोटीसांची कारवाई स्थगित करावी असे आवाहनही आ. सरोज आहिरे यांनी महसुल मंत्र्यांना केलेले आहे. त्यावर मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. यावेळी त्यानी जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेशित करतो असेही आश्वासन आ. सरोज आहिरेंना दिले आहे.