नाशिक – देवळाली येथील पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चारणवाडी परिसरातील ७ संशयितांची काल सोमवार २२ रोजी दुपारी एक वाजता पोलिस बंदोबस्तात शहरभर धिंड काढण्यात आली. शिवजयंतीच्या रात्री चारणवाडीतील समाजकंटकांनी येथील त्रिमूर्ती चौक परिसरात झालेली गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले. या घटनेची पोलीस आयुक्त यांनी गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापडलेल्या सात आरोपींना अटक केली होती. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचे काम पोलिसांचे असून त्याला गालबोट लावण्याचे काम जो कोणी करत असेल तर अशा गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यात येईल यात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.