देवळाली कॅम्प – भारत मातेच्या संरक्षणासाठी व अखंडता टिकविण्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे व त्यांच्या कुटुंबाप्रति देशातील नागरिक कायम ऋणी राहतील असे प्रतिपादन सेवानिवृत्त लष्करी अधिकारी विजय कातोरे यांनी केले. येथील नक्षत्र सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ आदर्श सैनिक संस्थेच्या जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला १४ फेब्रुवारी रोजी दोन वर्ष पूर्ण झाले. या घटनेची आठवण म्हणून या जवानांसाठी ‘एक दिया देश भक्तो के नाम ‘ या अभिवादनपर कार्यक्रमात कातोरे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी फ्लायिंग ऑफिसर पी.व्ही.उपाध्याय, कॅप्टन आसाराम राठोड, हवालदार जगन्नाथ शिरसाठ, हवालदार श्रीहरी दळवी, हवालदार डी.बी.कुटे, हवालदार जगदेव सिंग, अक्षय एडके,श्रेयस फडणीस,विनायक गोडसे, अशोक गोडसे, रावसाहेब तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकातून सेनि.नायक दीपचंद यांनी शहिदांचे स्मरण करत राहणे हे आपल्या संस्थेचे उद्दिष्ट असून हेच खरे देशाचे हिरो असून त्यांच्या बलिदानामुळे देश सुरक्षित असल्याचे सांगितले. यावेळी पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात येऊन उपस्थितांचा हस्ते मेणबत्ती हाती घेत दीप प्रज्वलन करण्यात येऊन शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार कॅप्टन आसाराम राठोड यांनी मानले.