नाशिक – गेल्या आठ महिन्यानंतर राज्य सरकारने दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे खुली करण्यात आली यानिमित्ताने देवळालीतील बंद असलेली मंदिरे देखील उघडण्यात आली आहे. येथील प्राचीन भैरवनाथ मंदिरात पहाटे पाच वाजेला काकड आरतीमुळे निर्माण झालेल्या प्रसन्न सुरावटींनी देवळालीकरांची मंगलमय पहाट सध्या उगवत आहे.
कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच भागवत एकादशी ( दि.२६ ) या दिवशी देवशयनी आषाढी एकादशीला झोपलेले देव जागे होतात. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये कार्तिक महिन्यात काकडा आरती करण्याची परंपरा असते. देवळालीच्या लॅमरोड भागात असलेल्या श्री भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्यावतीने गेल्या १०६ वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. सध्या धावपळीच्या जीवनामध्ये चार महिने वेळ मिळत नसल्याने कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकडा केला जातो. देवळालीतही भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या रूपाने ही परंपरा जोपासली जात आहे. यामध्ये रामकृष्ण गोडसे, रघुनाथ देवकर, नामदेव गोडसे, कैलास हारक, सुभाष जाधव, संपत सातपुते, पंढरीनाथ कुटे, अरुण देवकर, विलास चौधरी, भागवत तौर, रवी आडके, प्रशांत धिवंदे, निलेश गाढवे व महिला भजनी मंडळाच्या सदस्यांसह चौथ्या पिढीचे सदस्य देखील ही काकडा आरतीची परंपरा जोपासत आहे.
वारकरी संप्रदाय जोपासतंय सांस्कृतिक मूल्य
काकडा भाजनामध्ये देवाला,संतांना इतकाच काय सर्वसामान्य माणसासह आंधळा,मुका,बहिरा, वासुदेव,पिंगळा यांना जागवणाऱ्या अत्यंत सुंदर अभंगाची रचना केली आहे.पहाटेच्या वातावरणात ही भजनाची सुरावट मन प्रसन्न करून टाकते. या मंजुळ स्वरात केलेल्या भगवंताच्या जागरणाचा परिणाम कार्तिक शुद्ध एकादशीला होईल आणि निद्रेत असलेले भगवंत विश्वाच्या कल्याणासाठी जागे होतील. असा विश्वास महाराष्ट्राचे खरे सांस्कृतिक मूल्य असलेल्या व मानवी जीवनाचे अखंड केल्याने वाहणाऱ्या वारकरी संप्रदायाचा आहे. आणि हीच उदात्त शिकवण व वारसा पुढील पिढीने तितक्याच आत्मीयतेने जोपासल्याचे समाधान असून निदान तोपर्यंत काकडा भजनाचे हे सूर आपल्या कानावर पडत राहतील असे येथील नागरिक सांगतात.