नाशिक – राज्य शासनाने सर्वच शासकीय कामात मराठी भाषा वापर करणे अनिवार्य केलेले असतांना देशभरातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी सुरु करण्यात आलेल्या ई-छावणी पोर्टलमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव नसल्याने याबाबत येथील युवासेनेने मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची भेट घेत या पोर्टलमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणी त्या मागणीला मान्यता देत पोर्टलमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात आला आहे.
या महिन्याच्या प्रारंभी युवासेना शहरप्रमुख प्रमोद मोजाड, शहरसंघटक मधुकर गोडसे, उपशहरप्रमुख रोहित गोडसे, शहरसमन्वयक नविन देवकर आदींसह युवासेना पदाधिकारी यांनी मुख कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करतांना कॅन्टोन्मेंट हद्दीत आठही वॉर्डात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जे ई-छावणी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. ही निश्चितच आनंददायी बाब आहे मात्र त्यात केवळ दोनच भाषांचा समावेश आहे. त्यात असलेल्या इंग्रजी व हिंदी भाषेसोबत मराठी भाषेचा पर्याय असावा जेणेकरून सर्वसामान्यांना आपल्या राज्य भाषेत व्यवहार करणे, समस्यांची नोंद करणे अशा गोष्टी सोप्या होतील असे बोलतांना सांगितले. या मागणीची वरिष्ठ कार्यालयाने दखल घेत मराठी भाषेचा समावेश करण्यात आला आहे.