देवळाली कॅम्पमध्ये ५० वर्षीय महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीस्वाराने ओरबडले
नाशिक : फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ५० वर्षीय महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना संसरी लेन भागात घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजना मंगल ननसे (रा.रेल्वे ब्रिज जवळ,संसरी गाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रंजना नणसे या शुक्रवारी (दि.५) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. संसरी लेन भागातील भवानी सोसायटी समोरून त्या पायी जात असतांना अंधारातून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.
…..
स्टिलची हातगाडी चोरी
नाशिक : हॉटेलच्या शटरला बांधून ठेवलेली स्टिलची चारचाकी हातगाडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना अमृतधाम भागात घडली. हातगाडीत खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्य होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुभाष दराडे (रा.बिडीकामगारनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दराडे यांचा हॉटेल व्यवसाय असून त्यांचे अमृतधाम परिसरात दराडे फुडस नावाचे हॉटेल आहे. पुरेशी जागा नसल्याने त्यांनी हॉटेल बाहेर स्टेनलेस स्टिलची गाडी बनविली होती. गेल्या २८ जानेवारी रोजी रात्री दुकान वाढवून ते घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाबाहेर साखळीस बांधलेली चारचाकी स्टिलची गाडी चोरून नेली. या गाडीत खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्य व गॅस शेगडी असा सुमारे ३० हजाराचा ऐवज होती. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र वाघ करीत आहेत.
…..
मखमलाबादला एकाची आत्महत्या
नाशिक : मखमलाबाद परिसरात राहणा-या ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
राहूल माणिकराव पाटील (४० रा.अवानिस हरमुनी अपा.म.बाद) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. राहूल पाटील यांनी बुधवारी (दि.३) रात्री अज्ञात कारणातून सिटी सेंटर समोर विषारी औषध सेवन केले होते. त्यांना तात्काळ सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक पगार करीत आहेत.
……
गॅसच्या भडक्यात महिला ठार
नाशिक : गॅसच्या भडक्यात भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुष्पा बळीराम पगार (५२ रा.खुटवडनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. पुष्पा पगार शुक्रवारी (दि.५) आपल्या घरात स्वयंपाक करीत असतांना ही घटना घडली होती. अचानक गॅसचा भडका उडाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ गंगापूररोडवरील गंगा रेसिडेन्सी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.
…….
सिडकोत एकाची आत्महत्या
नाशिक : सिडकोतील मोरवाडी भागात राहणा-या ३० वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल पावरा (३० रा.मोरवाडी गाव) असे मृत तरूणाचे नाव असून तो ज्ञानेश्वर इप्पर यांच्या घरात भाडेतत्वावर राहत होता. पावरा याने शुक्रवारी (दि.५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. इप्पर यांनी खबर दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.
…………
धारदार शस्त्रासह तडीपारास अटक
नाशिक : तडीपार केलेले असतांना राजरोसपणे शहरात धारदार शस्त्रासह वावरणा-या गुंडास पोलीसांनी अटक केली. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली. रोहीत खंडू गांगुर्डे असे संशयिताचे नाव आहे. ५ फेब्रुवारी रोजी रोजी युनिट एकचे सपोनि दिनेश खैरनार, एएसआय काळु बेंडकुळे, हवालदार प्रविण कोकाटे, पोलीस नाईक योगीराज गायकवाड, महेश साळुंके, प्रविण वाघमारे, शिपाई राम बडे असे कार्यालयात असतांना हवालदार कोकाटे यांना मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील संशयित तडीपार रोहीत खंडु गांगुर्डे हा पंचवटी शिवारातील मुंजोबा चौक, फुलेगनर, पंचवटी येथे येणार आहे आणि त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचे कळाले. ही माहिती संबंधितांनी युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना कळवली. त्यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून मुंजोबा चौकात पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रोहीत पोलीसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेंव्हा त्याला पकडून ताब्यात घेतले. त्याच्या कंबरेला ३०० रुपये किंमतीची धारदार कुकरी मिळून आली. तो कोणतीही परवानगी न घेता वावरतांना मिळून आल्याने त्याच्या विरुध्द पंचवटी पोलीस ठाणेस आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.