देवळाली कॅम्प :- येथील कॅन्टोमेंट बोर्ड कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मासिक पगार गेल्या तीन महिन्यानासून झालेले नसल्याने या कर्मचाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांसह वरिष्ठ कार्यालयाकडे साकडे घातले होते. याप्रश्नी खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्ली येथील संरक्षण वसाहतीच्या सह महासंचालिका सोनम यंगडोल यांची भेट घेत हा मार्गी लावला असून येत्या आठ दिवसात आपण कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ४.५० कोटी रु.कॅन्टोनेन्ट प्रशासनाला वर्ग करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
याआधीच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा केंद्र शासनाकडे मागील ५ वर्षाचा सुमारे ४० कोटी जीएसटी व ११० कोटी रु. सर्व्हिस टॅक्स केंद्राकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी अतिरिक्त महासंचालिका सोनम यंगडोल यांना सांगितले. त्यासोबत या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या घरखर्चासह अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी जवळ शिल्लक असलेली रक्कम देखील संपली आहे.त्यामुळे ते हवालदिल झाले आहे. अनेकांचे कर्जाचे हफ्ते थकले तर काही मागे व्याजाचा भुर्दंडही लागला आहे.घरखर्च कसा चालवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट चतुर्थ श्रेणी कर्मचारी व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी याप्रश्नी डिसेंबर व जानेवारी महिन्यात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत काम केले. तर काहींनी धरणे आंदोलन केले होते. अखेर खासदारांनी याप्रश्नी थेट रक्षा संपदा विभागात भेट देत हा प्रश्न मार्गी लावल्याने कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.