देवळाली कॅम्प – मागील आठवड्यापासून नाशिक जिल्हाभरात वाढत्या करोना बाधितांच्या आकड्याचा विचार करत उपचारासाठी रुग्णालये कमी पडू नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून ८० बेडचे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुन्हा एकदा डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून सुरु करण्यात यावे याबाबतचे आदेश कॅन्टोन्मेंट प्रशासनास प्राप्त झाले आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलने उपचारादरम्यान आपल्या यंत्रणेद्वारे अगदी योग्य पद्धतीने करोनाग्रस्तांवर उपचार केले त्यांच्या या कार्याची पावती म्हणून रक्षा मंत्रालयाने त्यांना पुरस्कार देऊन गौरवान्वित देखील केले.पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात करोना बाधितांची आकडे वाढत असतांना टॉप टेन सिटीमध्ये नाशिक ९ स्थानावर गेले आहे. याशिवाय देवळालीत देखील मागील दोन दिवसात ३४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून बाधितांच्या आकड्याने हजारी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांना परिसरातच उपचार सुविधा प्राप्त व्हाव्या या उद्देशाने देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये पुन्हा ८० बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे पुन्हा उपचार सुरु करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरु केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी दिली आहे.