नाशिक – देवळाली कन्टॉन्मेंट हॉस्पिटलने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हॉस्पिटलला रक्षामंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. देवळाली बरोबरच पुण्यातील खडकी हॉस्पिटललाही हा पुरस्कार मिळाला आहे.
रक्षा संपदा विभागाच्या महानिदेशक कार्यालयासह देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड व प्रादेशिक कार्यालय यांच्यासोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महासंचालिका दीपा बाजवा, सहसंचालिका सोनम यंदोल यांसह सर्व अतिरिक्त संचालक व व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. तर देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालयामध्ये हे या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जे एस गोराया नगरसेवक बाबुराव मोजाड, भगवान कटारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार सह मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिक्षिका जयश्री नटेश, आरोग्य अधीक्षक रजिंदर सिंह ठाकुर, डॉ. मोनिका गोडसे,देवी लखमियानी, शीला आहेर आदींनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी ब्रिगेडियर गोरा यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व सर्व स्टाफसह आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा पुरस्कार केवळ सर्व डॉक्टर नर्सेस व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर मिळाला असल्याचे सांगितले.
अशी आहे कामगिरी
मे महिन्यापासून ते आजतागायत देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ५९२३ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून यामध्ये १५३० नागरिक कोविड पॉझिटिव्ह आढळून आले होते. यापैकी १२३३ रुग्णांवर कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. तर ८१८ नागरिकांना घरीच विलगीकरण करत उपचारासाठी सहाय्य करण्यात आले. दरम्यान शहरात ६१५० नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात आली तर १४२२ नागरिकांचे रॅपिड टेस्ट अंतर्गत चाचणी करण्यात आली होती. यामध्ये २५७ नागरिक पॉझिटिव्ह आढळले तर शहरात केवळ ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.