सर्वपक्षीय इच्छुकांची रस्सीखेच- सर्वसामान्यांच्या नावांचाही समावेश
नाशिक – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती व्हावी म्हणून देवळालीतील विविध पक्ष व सामाजिक संस्थांच्या २७ अर्ज प्राप्त झाले आहे. संरक्षण वसाहतीच्या सहाय्यक महासंचालक दमन सिंग यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर हे अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ कलम १३ (२) सी मध्ये असलेल्या तरतुदीनुसार बोर्ड बरखास्त झाल्यापासून पुढील निवडणूक जाहीर होईपर्यंत बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व जनतेचा प्रतिनिधी अशा त्रिसदस्यीय समिती मार्फत बोर्डाचा कारभार चालतो. यातील नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी आलेल्या २७ अर्जामध्ये शिवसेना,भारतीय जनता पार्टी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या प्रमुख पक्षांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज दिले आहे. मात्र या अर्जाव्यतिरिक्त देवळालीतील अन्य कोणीही अर्ज न केलेल्याचे नाव सुद्धा समाविष्ट केले जाऊ शकते. त्यामुळे हे नावे पाठविण्याचा अधिकारी कायद्यानुसार लष्कराचे येथील कमांडर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे. मात्र सध्या केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यात राज्यातील सातही कॅन्टोन्मेंट बोर्डावर भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाच्या गोटातील एकाची निवड होण्याचे संकेत आहे.त्याकरिता हालचाली गतिमान झाल्या आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेचे असून सध्या केंद्रात भाजपा व सेनेत विळा-भोपळ्याचे वैर आहे.त्यामुळे खासदार गोडसे यांनी या पदासाठी दिलेले शिफारस पत्र हे केवळ कार्यकर्त्यांची बोळवण असल्याचे बोलले जात आहे. बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी नेमके कोणाची नावे पाठवितात की पक्षीय पातळीवर कार्यकर्ते यांची सोय करण्यात येणार याबाबत देवळालीत उलटसुलट चर्चा रंगत आहे.मात्र देवळालीच्या विकासासाठी प्रयत्नरत राहणाऱ्या व्यक्तीचे ३ नावे दिली जावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.
असे आहेत अर्जदार
कॅन्टोन्मेंट बोर्डात काम केलेल्या सदस्यांपैकी बळवंत गोडसे,विश्वनाथ काळे, बाबुराव मोजाड, बसंत गुरुनानी, सचिन ठाकरे, दिनकर पाळदे, सुनंदा कदम, कावेरी कासार, भगवान कटारिया योगेश वाधवा यांसह प्रितम आढाव, चंद्रकांत गोडसे, तानाजी भोर, अनिता गोडसे, सायरस पिठावला, गौतम पगारे, नितीन गायकवाड, संजय गोडसे, चंद्रप्रभा केदारे, यास्मिन नाथानी,हसानंद निहलानी, वैभव पाळदे, पत्रकार प्रवीण आडके, उमेश मोजाड, विजयकुमार ओसवाल, पुष्पा ओसवाल, राजेश पवार आदींचा समावेश आहे, कायद्याच्या तरतुदी नुसार नियुक्ती होणारी व्यक्ती ही त्या हद्दीतील रहिवासी असावी लागते. तरी देखील नाशिक येथील दोघांनी या साठी अर्ज केला आहे,मुळात अर्ज केलेल्या पैकीच कोणाची नियुक्ती करावी असा कायदा नसल्याने याचे व्यतिरिक्त देखील नियुक्ती होऊ शकते.