नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्डातील कोविड सेंटर पुन्हा कार्यन्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बोर्डाच्या क्षेत्रात राहणाऱ्या बाधितांना या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळू शकणार आहेत.
वाढत्या कोरोना बाधितांच्या आकड्याचा विचार करत उपचारासाठी रुग्णालये कमी पडू नये म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या सूचनेवरून ८० बेडचे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुन्हा एकदा डेडिकेटेड कोविड सेंटर होणार आहे. तसे आदेश कॅन्टोन्मेंट प्रशासनास प्राप्त झाले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलने उपचारादरम्यान आपल्या यंत्रणेद्वारे अगदी योग्य पद्धतीने कोरोनाग्रस्तांवर उपचार केले. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून रक्षा मंत्रालयाने त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात करोना बाधितांची आकडे वाढत आहेत. देवळालीतही गेल्या दोन दिवसात ३४ कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून बाधितांच्या आकड्याने हजारी पार केली आहे. त्यामुळे नागरिकांना परिसरातच उपचार सुविधा प्राप्त व्हाव्या, या उद्देशाने देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये पुन्हा कोरोनाचे उपचार होणार आहेत.
८० बेड ची व्यवस्था असलेले हे हॉस्पिटल पुन्हा कोविड सेंटर होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरु केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी दिली आहे.