नाशिक – नाशिक शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्डानेही कोरोनासाठी आवश्यक त्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. कॅन्टॉन्मेंटच्या हद्दीत नक्की काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार, हे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
बोर्डाचे सीईओ अजय कुमार यांनी जाहीर केलेल्या सूचनेनुसार, नियमांचे पालन ना करणाऱ्या नागरिक व व्यापाऱ्यांविरोधात आर्थिक दंडाची कारवाई केली जाणार आहे. नाशिक जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या सर्व आदेश या जाहीर नोटिशीत नमूद आहे. यांची अंमलबजावणी करतांना देवळाली देखील जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने ही सांयकाळी ७ वाजेपर्यंत बंद न करणाऱ्या व्यापारी व दुकानदारांना २ हजार रुपये दंड तर शनिवार व रविवारी दुकाने खुली करणाऱ्यांविरोधात अडीच हजार रुपये दंड केला जाणार आहे.
रविवारी भरणारा आठवडे बाजारही पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद तर येथील भाजी मार्केट ५० टक्के क्षमतेने सुरु राहील. हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते रात्री ९ वाजेपर्यंत तर बाह्य पार्सल विक्री सुविधा असलेले मान्यताप्राप्त उपहार गृहे यांना केवळ पार्सल विक्री व होम डिलेव्हरीकामी १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात ५ हजार रु. दंड केला जाणार आहे. परिसरात सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक सण व उत्सव साजरे करण्यावर बंदी घातली गेली आहे.