नाशिक – देवळाली कॅम्प कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कॅन्टॉन्मेंट बोर्डात भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची सत्ता आहे. युतीच्या सर्व नगरसेवकांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. बोर्डाला सध्या वाढीव मुदत मिळाली आहे. कटारिया यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे कटारिया यांनी राजीनामा द्यावा, असे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले. त्यानुसार कटारिया यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा बोर्डाच्या अध्यक्षांकडे दिला आहे. यावेळी भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष प्रितम आढाव, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, कावेरी कासार, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, रतन कासार आदी उपस्थित होते. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार नवा उपाध्यक्ष निवडला जाईल, असे पालवे यांनी सांगितले आहे.
कुणाला संधी मिळणार
उपाध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी भाजपचेच बाबुराव मोजाड आणि सचिन ठाकरे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. मोजाच हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. तर, ठाकरे यांच्याकडेही अनुभव आहे. त्यामुळे कुणाला संधी मिळणार याबाबत परिसरामध्ये उत्सुकता आहे.