नाशिक – देवळाली कॅम्पसह पुणे, देहूरोड, खडकी अशा ६ तर देशातील ५६ कॅन्टॉन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे या सर्वच कॅन्टॉन्मेंटमध्ये हालचालींना वेग आला आहे.
देशातील एकूण ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने १ फेब्रुवारी रोजी घेतला आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ कॅन्टॉन्मेंट बोर्डांचा समावेश आहे. संरक्षण विभागाच्या प्रधान निर्देशकांनी याबाबतचे पत्र देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना पाठविले आहे.
देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांची मुदत १० फेब्रुवारी २०१९ रोजी संपली. कॅन्टोन्मेंट कायदा तरतुदीनुसार दोन वेळा सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे येत्या १० फेब्रुवारीला ही मुदत संपत असल्याने संरक्षण विभागाने बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ११ फेब्रुवारी पासून बोर्ड बरखास्त होणार आहे.
आता काय होणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्टोमेंट बोर्डाचे विसर्जन झाल्यावर केंद्र सरकार बोर्डाची पुनर्चना (व्हॅरी कॉन्स्टिट्युशन ऑफ बोर्ड) करू शकते. कॅन्टोमेंट निवडणुकांची घोषणा होईपर्यंत हे पुर्नरचित बोर्ड कॅन्टोमेंटचा कारभार चालविते. त्यावर बोर्डाचे, अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकार तर्फे जनतेच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती केली जाते. जनतेचा प्रतिनिधी कॅन्टोमेंटच्या सर्व बोर्डाचे नागरी प्रतिनिधत्व करतो. त्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव मागितल्यावर जनतेचा प्रतिनिधी होण्यास इच्छुक व्यक्ती कॅन्टोमेंट बोर्डाकडे अर्ज करतो. हे सर्व सरंक्षण मालमत्ता विभागाचे प्रधान संचालक कार्यालय, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख यांच्या शिफारसी सोबत संरक्षण मालमत्ता विभागाच्या महासंचालक कार्यालयाकडे आणि संरक्षण मंत्रालयाकडे पाठविले जातात. त्यानंतर मंत्रालयातर्फे सर्व कॅन्टोमेंट बोर्डासाठी नामनिर्देशित जनतेच्या प्रतिनिधींची अधिसूचना काढली जाते.
दरम्यान, देवळालीसह सर्वच कॅन्टोमेंट बोर्डातील इच्छुकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फिल्डींग लावण्याचे काम सुरू केले आहे.