नाशिक – खेळाच्या मैदानात उतरतांना प्रत्येकाने आपल्या संपूर्ण प्रयत्न हे विजयाच्या दृष्टीकोनातून करावे व खेळाच्या निमित्ताने समाज एकत्र येतांना आपले सकारात्मक विचार इतरांना कसे देता येतील याचाही प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे छोटी गुरू माँ यांनी सांगितले.
आनंद रोड मैदानावर पूज्य सिंधी पंचायत देवळाली,रितिका- भाविशा सांस्कृतिक मंच नाशिक यांच्या वतीने काल दि.९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सिंधी प्रीमियर लीगच्या शुभारंभप्रसंगी छोटी गुरु माँ या उपस्थितांशी संवाद साधत होत्या. यावेळी आमदार सरोज अहिरे, माजी आमदार ज्योती कलानी, उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक बाबुराव मोजाड, भगवान कटारिया, आशा गोडसे, मनोहर कारडा, ऍड अनिल अहुजा, प्रकाश केवलानी, हसानंद नेहलानी,बाबूशेठ कृष्णानी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संबोधताना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे म्हणाले कि,खेळाच्या निमित्ताने ज्याप्रमाणे सिंधी समाज एकवटला आहे त्याचे अनुकरण अन्य समाजाने करणे गरजेचे आहे तर माजी आमदार ज्योती कलानी म्हणाल्या कि, आयुष्यात खेळात अथवा आपण करत असलेल्या कामात प्रामाणिकपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे जेणेकरून समाजाचे नाव उज्ज्वल करता यावे. या लीग दरम्यान स्त्री व पुरुष अशा गटांमध्ये क्रिकेटसह खो खो व बॅडमिंटन आदी खेळ खेळविण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन चावला तर आभार हिरो रिझवानी यांनी मानले. याप्रसंगी नाशिक, उपनगर, नाशिकरोड, देवळाली परिसरातील सिंधी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.