नाशिक – देवळालीत माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. येथील गुरुद्वारा रोडवरील इच्छापूर्ती गणेश मंदिरात सकाळी श्रीं च्या मूर्तीस शामराव कदम यांच्या हस्ते अभिषेक तर बाळकृष्ण घोलप यांच्या उपस्थितीत सहस्त्रावर्तन करण्यात आले. दिवसभर मंदिरात गणेश भक्तांची दर्शनासाठी रांग लागलेली होती. सांयकाळी महाआरती तर रात्री घोटी खुर्द येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल परदेशी, कैलास परदेशी, कैलास धुर्जड, गिरीश गायकवाड, दशरथ कासार, कमलेश खरोटे, अशोक कळमकर यांनी परिश्रम घेतले.
विजय अमरदीप मंडळाच्या वतीने दुपारी होमहवनादी कार्यक्रम व त्यानंतर रात्री भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भरत पाटील, राजेश नटेश ,सुनील वाधवानी ,जितेंद्र दसपूते, राहुल नाणेगावकर, सुनील गाडेकर, प्रभाकर आवारे, अशोक परदेशी यांसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या विघ्नहर्ता गणेशमंदिरात सांयकाळी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सह्याद्री नगर येथील गणेश मंदिरात पूजा अभिषेक करण्यात आला व सायंकाळी नगरसेवक सचिन ठाकरे यांच्या उपस्थितीत महाप्रसाद वाटप करण्यात आला. गवळीवाड्यातील सिद्धिविनायक गणेश मंदिरात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष सुनंदा कदम व गवळीवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश कदम यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. दुपारी विवेक धोपावकर यांच्या पौरोहित्याखाली गणेशयाग करण्यात आला. यावेळी प्रशांत गोडसे, शिवा गवळी, प्रकाश यादव यांच्या उपस्थितीत सत्यविनायक कथेचे वाचन करण्यात येऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीकचरू गोडसे, बाळकृष्ण नायडू, रमेश शिरसाठ, दीपक बुंदेले, रवी हाबडे, करण मेन्द्रे, कुणाल यादव आदींसह गवळीवाडा मित्र मंडळाचे सदस्य प्रयत्नशील होते.