नाशिक -देवळाली कॅम्पमध्ये ब्रिटिशपूर्व काळापासून सुरु असलेला रविवारचा बाजार प्रथमच करोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून गेल्या सहा महिने बंद होता. आता हा बाजार पुन्हा रविवार पासून पूर्ववत सुरु झाला आहे. देवळाली कॅम्प शहरात दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजार देशात गेल्या सहा महिन्यापूर्वी लागू झालेल्या कलम १४४ मुळे कॅन्टोन्मेंट प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शहरात कमी झालेला करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यात देशात देखील अनलॉक प्रक्रिया पाच जाहीर केले. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करतांना बाजारात दोन विक्रेत्यांसह नागरिकांमध्ये विशेष अंतर पाळले जाईल अशा उपाययोजना करण्यात आल्या आहे. यासाठी घटना व्यवस्थापक असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे यांच्यावर या आठवडे बाजाराच्या बाबतीत असलेल्या सर्व पालनाची विशेष जबाबदारी दिली आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील सर्व दुकाने सकाळी ८ ते सांयकाळी ८ पर्यंत सुरु ठेवण्याचीही मुभा व्यावसायिकांना मिळाली आहे. हॉटेल ,बार व परमिटरूम हे रात्री ९ पर्यंत सुरु राहतील अशी माहिती नगरसेवक भगवान कटारिया यांनी दिली आहे.