मुंबई – औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन वाद सुरू असतानाच शिवसेनेने आता एक पाऊल मागे घेतले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेच विरोध केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता दुधाची तहान ताकावर भागविण्याचा निर्णय घेतला आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. कारण, औरंगाबाद शहराचे नामांतर होऊ शकत नसले तरी औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी.