सिडनी- दुसऱ्या महत्वपुर्ण वन-डे सामन्यात देखील शेवटपर्यंत कोणताही चमत्कार घडला नाही आणि अगदी पहिल्या सामन्याप्रमाणेच भारतीय संघाचा मोठा पराभव करुन आॕस्ट्रेलियाने सामन्यासहित मालिकाही २-० अशा फरकाने जिंकली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८९ धावांचे विशाल लक्ष्य गाठण्यासाठी सिडनी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला ५० षटकात ९ बाद ३३८ धावाच करता आल्या आणि अखेरीस ५१ धावांच्या मोफरकाने भारतीय संघाने दुसरी वन-डे गमावली. २५ षटकांचा खेळ पुर्ण होईपावेतो भारताचे प्रमुख फलंदाज मयंक अगरवाल, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर पॕव्हेलियनमध्ये परतले होते. त्यावेळी मैदानात विराट कोहली आणि के एल राहुल हे खेळत असल्याने आणि जिंकण्यासाठी षटकामागे १० ते ११ इतकी धावगती आवश्यक असल्याने भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण, भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतांना जो दबाव असतो त्या दबावापुढे कर्णधार कोहली, आयपीएल गाजवणारा के एल राहुल, घणाघाती अष्टपैलू अशी ओळख असणारा हार्दीक पांड्या आणि हरहुन्नरी रविंद्र जाडेजा सपशेल अपयशी ठरले.
परदेश दौ-यावर आणि खास करुन उसळत्या खेळपट्टीवर भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उभे केले जाते. भारतीय संघाच्या लागोपाठच्या दोन अपयशानंतर यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असुन आता कसोटी आणि ट्वेन्टी- ट्वेन्टी मालिकेत तरी भारतीय संघाला लय सापडते की नाही, असे प्रश्न चाहत्यांकडून विचारले जावू लागले आहेत.
रोहीत शर्माच्या निवडीचा पेच, विराटने मागितलेली रजा आणि त्याआधी संघनिवड करतांना सुर्यकुमार, इशान किशन अशा चांगल्या खेळाडूंना डावलण्यामागची निवड समितीची अनाकलनीय भुमिका यामुळे हा आॕस्ट्रेलिया दौरा चांगलाच चर्चेत आहे. आता या दौऱ्यावरील वन-डे मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना येत्या २ डिसेंबर रोजी कॕनबेरात खेळला जाईल.
कर्णधार विराट कोहलीने ८९ तर के एल राहूलने ७६ धावा केल्या. अन्य फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. भारताचा जवळपास पूर्ण संघ गारद करण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश आले. वन-डे क्रिकेट इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने अद्याप पर्यंत जास्तीत जास्त ३६२ धावांचा पाठलाग करून सामना जिंकला आहे. आज आपला स्वतःचा हाच विक्रम मागे टाकून नव्या विक्रमाची नोंद करण्याची भारतीय संघाला नामी संधी होती. पण, ती साधता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्यावतीने स्टीव्ह स्मिथने (१०४) शतकी खेळी केली. तर, डेव्हिड वॉर्नर (८३), एरॉन फिंच (६०) व मार्नस लबुशेन (७०) यांच्या जोरदार फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाचे केवळ पाच फलंदाजच बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया – ३८९/४
भारत – २२३/९