केळीची टांचणी करतांना अक्षरशः हाताला फोड यायचे, उसाच्या सरीमध्ये पाणी भरतांना उसाच्या पाचटांमुळे हाता-पायांवर चिरा पडत असत. उसातून बाहेर आल्यानंतर मात्र अंगाची आग होत असे. याची नंतर सवय झाली. घरी २४-२५ माणसांचं कुटुंब. बाहेर शिकणारे, पै पाहुणे या सर्व खर्चाचा ताळमेळ बसवतांना वडिलांची काय परिस्थिती होत असेल याची जाणीव झाली.असं हे सर्व सुरू असतांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे वडील कर्ज घेण्याच्या विरूद्ध होते. जे काही असेल त्यात भागवायचं. ही त्यांची शिकवण आम्हा सर्वांना आयुष्यभर कामी आली.
यात काही कामं मला नकोशी वाटत. शुक्रवारी गावात बाजार भरत असे. भाजीपाला पाटीत भरून तीन किलोमीटरवर पायी या बाजारात भाजी विकायला जावे लागत असे. वडिलांनी ठरवून दिल्याप्रमाणे भाजीपाल्याची विक्री करावी लागत असे. विक्री करून संध्याकाळी पैशांचा हिशोब द्यायचा. मात्र बाजारात गेल्या वर बरेच ओळखीचे लोक भेटत त्यात आमच्या मामांचे गांव जवळ असल्याने कोणीही हक्काने दोन चार लिंबू काही भाजी घेत असत. वडिलांना मात्र हिशोब देतांना माझी पंचायत व्हायची. पण यातून बरच काही शिकायला मिळालं. कोणत्याही कामाची लाज वाटायला नको. शेती करतांना किती कष्ट करावे लागतात याची जाणीव पुढे आयुष्यभर आम्हाला उपयोगी पडली.
साल होत १९७२. पाऊसच पडला नाही. पेरण्या नाहीत. जनावरांना चारा नाही. विहिरी आटल्या. आमच्या मळ्यातली विहीर यापूर्वी कधीही आटलेली पाहिली नाही. पाणी खोल गेलेलं. वडिलांनी विहिरीचा गाळ काढण्याचं ठरलं. मजूरी देणं शक्य नव्हतं म्हणून घरच्याघरीच हे काम करण्याचं ठरलं. मी पदवीधर होऊन घरीच होतो. माझ्या दोन्ही लहान भावांना सोबत घेऊन ५० ते ६० फूट खोल विहिरीत उतरून सर्व गाळ काढला. त्यामुळे विहिरीचे पाणी वाढले. त्या वर्षी आम्हाला गव्हाचे उत्पन्न एकरी २३-२४ क्विंटल पर्यंत झाले.
खरीप हातातून गेल्याने गव्हामुळे वर्ष भराचा धान्याचा कुटूंबांचा प्रश्न मिटला. याच काळात मी रोजगार हमीच्या कामाला गेलो. तेथे काम करत असतांना मला लोकांच्या कथा व व्यथा जवळून अनुभवता आले. ज्या घरातील महिलांनी कधी आपली शेती सोडून कामे केले नाहीत त्यांनाही रोजगार हमीच्या कामावर रखरखत्या उन्हात मोलमजुरी करावी लागली. असा हा दुष्काळ माझ्या आयुष्यात बरच काही शिकवून गेला.
फोन नं – 9881060777
Lovely Read Papa