नाशिक – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे कनिष्ठ अभियंता पदासाठी निवड आणि कागदपात्रांची पडताळणी पूर्ण होऊनही तब्बल आठ महिन्यांपासून विद्यार्थी प्रतिक्षेतच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता थेट ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यानिमित्ताने महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ महिने उलटूनही पुढील कोणतीही सूचना महावितरणतर्फे देण्यात आलेली नाही. ऊर्जामंत्री यांची नागपूर येथे भेट झाल्यावर संबंधित प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरु होणार असल्याचे आश्वासन मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु दिलेले आश्वासन फोल ठरत असल्याने विद्यार्थ्यांनी आता ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. शाश्वती नको ! हक्काची नोकरी हवी असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवल्याने पर्यायी अन्य नोकरीचा विचार विद्यार्थ्यांनी केला नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने २ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. महावितरणचा बेजबाबदारपणा अनेकदा समोर येत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. वेळोवेळी विचारणा केली असता संबंधित कर्मचारी व अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कनिष्ठ अभियंता पदासोबतच कंत्राटी तत्वावर भरती न झाल्याने विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागत आहे. महावितरणतर्फे भरती संदर्भात अनेकदा विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असल्याने संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यात असमन्वय असल्याचे दिसून येत आहे.
—
गुणपत्रांची पडताळणी झाल्यावर ४५ दिवसात रुजू होण्यासंबंधी माहिती देण्याचा महावितरणचा नियम आहे. परंतु आता आठ महिने उलटूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचेकडे वारंवार विचारणा केली असता उडवाउडविची उत्तरे देण्यात आल्याने आंदोलनाचा पर्याय निवडला आहे. त्याअनुषंगाने २ सप्टेंबरपासून प्रकाशगड येथे आंदोलन होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची यात निवड झाल्याने रुजू कधी होणार याची वाट पाहत आहोत.
– अमोल बोडके, विद्यार्थी