निलेश गौतम
………
सटाणा – केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविल्यानंतर सर्वच राजकारण्यांनी हे आमच्यामुळे झाले असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने शेतकरीमध्ये अजूनच संतापाची लाट उसळली आहे. ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या चाळीत कांदा सडत होता. जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरून कांदा आंदोलन करीत होते. तेव्हा श्रेय घेणारे राजकारणी कुठे गेले होते. असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या गोटातून विचारला जात आहे. सर्वच लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या सोशल मीडिया वर साहेबांनी केले ताईंनी केले म्हणून चर्चा करतांना दिसत आहे. तर कांदा उत्पादक शेतकरीच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रीया देत आहेत. मागील दोन महिन्यात केंद्रसरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. एकीकडे रोजच चाळी मध्ये कांदा सडत होता. तर दुसरीकडे रोजच पाचशे हजारने भाव कोसळत होते. शेतकरी एकीकडे लाखो रुपये खर्च करून पिकवलेला माल ८ ते १० महिने सांभाळत असताना रोजच्या पडलेला भावामुळे आहे. त्या कवडीमोल दरात कांदा विकून मोकळा झाला असंख्य शेतकरीनी पडलेले भाव आणि कांदा सडण्याच्या भीतीने आपला सर्व कांदा विकून टाकला. आता सरकारने निर्यात बंदी उठवली जी फक्त शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या प्रकारातील आहे. अशा वेळेस ही निर्यात बंदी व्यापाऱ्यांना फायद्याची असल्याची प्रतिक्रिया ही शेतकरी वर्गाकडून दिली जात आहे. तर लोकप्रतिनिधींनी ही निर्यात बंदी आपल्या मागणी मुळेच उठल्याच्या बातम्या आणि सोशल मीडियावर जाहीर केल्याने खरा कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा संतापला आहे .जर तुमची मागणी केंद्राने मान्य केली तर दोन महीने शेतकरी कवडी मोल दारात माल विकत होता. आंदोलन करीत होता. तेव्हा का नाही उठविण्यात आली ही निर्यात बंदी असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.
प्रतिक्रिया
आमच्याकडे मागच्या दोन महिन्यात ६०० क्विंटल कांदा शिल्लक होता योग्य भावाच्या अपेक्षेने आठ महिने कांदा सांभाळला एकीकडे चाळीत मोठ्या प्रमाणावर कांदा सडत होता तर दुसरीकडे रोजच भाव कोसळत होते आशा स्थितीत आम्ही सर्व कांदा कवडीमोल दरात विकून टाकला. आता निर्यात बंदी उठवली. मात्र तिचा फायदा शेतकरी सोडून व्यापाऱ्यांनाच जास्त होईल.
सचिन सोनवणे, कांदा उत्पादक शेतकरी
कांदा निर्यात बंदी उठविणे म्हणजे वराती मागुन घोडे दामटने असा हा केंद्र सरकारचा केवींलवाणा प्रयत्न आहे उठविलेली निर्यात बंदीचा शेतकऱ्याला कुठला ही फायदा होणार नाही. या निर्यात बंदीचे कुठल्याही कांदा उत्पादक शेतक-यांकडून होणार नाही.
निवृत्ती सोनवणे, शेतकरी माजी सरपंच, डांगसौंदाणे