लंडन – जगातील पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये एकेकाळी समावेश असलेले अनिल अंबानी सध्या सर्वसामान्य बनले आहेत. वकीलांची फी देण्यासाठी त्यांना चक्क सोन्याचे दागिने विकावे लागले असल्याचे समोर आले आहे. इंडस्ट्रीअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक त्याचप्रमाणे एक्जिम बँक ऑफ चायनाने अनिल अंबानी यांच्या विरोधात ब्रिटनच्या न्यायालयात दाद मागितली आहे. या कोर्टापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची सद्यस्थिती समोर आली आहे.
एक सर्वसामान्य आयुष्य जगत असून सध्या माझा खर्च पत्नी टीना अंबानी करत आहे. तसेच माझ्याकडे फक्त एकच कार असल्याचे त्यांनी इंग्लंडमधील कोर्टात सांगितले आहे. यासंबंधी अनिल अंबानी यांनी संपत्तीची माहिती जाहीर करण्याची मागणी चिनी कंपन्यांनी तसेच बँकांनी कोर्टाकडे केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनिल अंबानी शुक्रवारी लंडनमधील उच्च न्यायालयासमोर हजर झाले होते.
सहा महिन्यात विकले कोट्यवधींचे दागिने विकलेजानेवारीपासून जून दरम्यानच्या सहा महिन्यात कोट्यावधी रुपयांचे दागिने विकले असून आता विकण्यासारख्या मौल्यवान वस्तू शिल्लक राहिलेल्या नाहीत, असे अंबानी यांनी कोर्टाला सांगितले आहे. त्याचप्रमाणे कधीही रॉल्स रॉयस कार आपल्याकडे नव्हती. सध्या एकाच कारचा वापर करत असल्याचे त्यांनी कोर्टाला स्पष्ट केले आहे.