लखनऊ – विकृती कोणत्याही शिक्षेला घाबरत नाही. त्यातही भारतात बलात्काऱ्यांना फाशी होण्याचे प्रमाण नगण्य असल्यामुळे नराधमांना शिक्षेचेही भय राहिले नाही. उत्तर प्रदेशातील कोतवाली गावातील एक दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा देशातील जनभावना उफाळून आल्या आहेत. आजीसोबत निघालेल्या एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना अंगावर काटे आणणारी आहे.
भर दुपारी आजीसोबत घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीला चार तरुण खेचत शेतात घेऊन गेले आणि त्याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांत तक्रार तर दिली पण अद्याप आरोपी फरार असल्यामुळे वातावरण शांत झालेले नाही. त्याचवेळी पीडितेच्या भावाला आरोपी पक्षाच्या गावकऱ्यांनी तीन तास बसवून ठेवले आणि पंचायतवर निर्णयाचा दबावही आणला, अशीही चर्चा आहे.
आजी आणि नात दुपारी १ च्या सुमारास जंगलात कापणीसाठी गेल्या होत्या. आजी थोडी पुढे निघून गेली आणि नात मागे राहिली. त्याचदरम्यान नात गायब झाल्यामुळे आजीची शोधाशोध सुरू झाली. त्याचवेळी पीडितेचा भाऊ जंगलात पोहोचला. त्याने शेतात काही लोकांना पळताना बघितले आणि बाजूला बहीण नग्र व बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. भावाने आरोपींचा पाठलाग केला. पण त्यांच्या मागे धावता धावता तो आरोपींच्या गावात येऊन पोहोचला. तिथे त्याला पंचायतमध्ये तीन तास बसवून ठेवण्यात आले. तिकडे शेतात बहीण बेशुद्ध अवस्थेत पडली आहे आणि दुसरीकडे भावावर दडपण आणले जात होते. शेवटी रात्री नऊ वाजता पीडितेचे कुटूंब पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले व तक्रार दाखल केली.
पंचायतने दिली धमकी
आरोपींसोबत त्यांच्या गावानेही निर्लज्यपणाचे दर्शन घडविले. संपूर्ण गाव मिळून पीडिता व तिच्या कुटुंबावर दडपण आणू लागले. उलट पंचायतने पीडिताच चार वर्षांसाठी तुरुंगात जाईल, अशी धमकी दिली. तसेच बदनामीचाही धाक दाखविला. याशिवाय काहींनी तर पैशांचेही आमिष दिले. आता या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे.