नाशिक – शहरासह जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल, बार, मद्य दुकानांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत या सर्वांना परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दुकानांसाठी सकाळी ७ ते ८, मद्य विक्री करणारी हॉटेल/बारसाठी ११ ते ९, मद्य विक्री न करणाऱ्या हॉटेल साठी सकाळी ८ ते ९ तसेच वाईन शॉप साठी सकाळी ९ ते ७ अशा वेळा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित करण्यात आलेल्या होत्या.
शासनाने वरील अधिसूचनेच्या परिशिष्ट ५ मध्ये दिलेल्या सूचनांचा विचार करून तसेच या संदर्भात मा पालकमंत्री पोलीस आयुक्त मनपा आयुक्त पोलिस अधीक्षक या सर्वांशी चर्चा करून, आता या संदर्भातील यापूर्वीचे सर्व आदेश रद्द करून सर्व आस्थापनासाठी एकसमान सकाळी ९ ते रात्री ९ अशी वेळ उद्यापासून (१५ ऑक्टोबर) निश्चित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जीवनावश्यक बाबींच्या आस्थापनासाठी वेळेची कोणतीही मर्यादा राहणार नाही.
कंटेनमेंट झोनमधील आस्थापना साठी पूर्वीच्याच वेळेच्या मर्यादा व अन्य नियम कायम राहतील, असेही मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.