नाशिक – दुकानदार महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून पसार होणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले. ही घटना हिरावाडीतील त्रिमुर्तीनगर भागात घडली. भामट्याने खरेदीचा बहाणा करून महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले होते. मात्र महिलेच्या सतर्कतेमुळे तो हाती लागला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पांडूरंग गावित (२९ रा. पळसन, ता.सुरगाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कल्पना ज्ञानेश्वर राऊत (रा. त्रिमुर्तीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. राऊत यांचे घराजवळच आत्मा मालिक नावाचे किराणा दुकान आहे. गुरूवारी (दि.२४) रात्री त्या दुकान बंद करीत असतांना ही घटना घडली. फेअर अॅण्ड लव्हलीचे पाऊच घेण्यासाठी संशयित दुकानात आला. त्याच्याकडील दहा रूपये राऊत गल्ल्यात टाकत असतांना संशयिताने त्यांच्या राऊत सुमारे २५ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र ओरबाडून धुम ठोकली. मात्र राऊत यांनी वेळीच आरडाओरड केल्याने वाटसरूंनी संशयितास पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्यास पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.
—
उघड्या घरातून रोकडसह दागिने चोरी
नाशिक – घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील रोकड आणि दागिणे चोरून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर रविंद्र धनगर (रा. रूख्मिणी रो हाऊस, अहिल्याबाई होळकर चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धनगर कुटूंबिय मंगळवारी (दि.२२) आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात प्रवेश केला. या वेळी भामट्यांनी हॉलमधील कपाट उघडून लॉकरमधील २८ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे अलंकार असा सुमारे ४३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक भडींगे करीत आहेत.
—
दुकानातून चांदीच्या दागिन्यांची चोरी
नाशिक : खरेदीच्या बहाण्याने ज्वेलरी दुकानात शिरलेल्या भामट्या महिलांनी दुकानदाराचे लक्ष नसल्याची संधी साधत चांदीचे दागिने हातोहात लांबविल्याची घटना आडगाव येथील घडली. याप्रकरणी पोलीस दप्तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश राजेंद्र कुलथे (रा.लक्ष्मीनगर जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलथे यांचे शिवकृपा स्विट दुकानासमोर आर.के.ज्वेलर्स नावाचे ज्वेलरी दुकान असून शुक्रवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कुलथे आपल्या कामात व्यस्त असतांना तीन अनोळखी महिला खेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या होत्या. यावेळी कुलथे त्यांना चांदीचे अलंकार दाखवित असतांना भामट्या महिलांनी दोन तोरडी जोड आणि एक अंगठी असा सुमारे दहा हजाराचे दागिणे हातोहात लांबविले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.