नाशिक – त्र्यंबकरोडवरील सिव्हिल हॉस्पिटलमधून ३ दिवसांपूर्वी दीड वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करणारा अखेर जेरबंद झाला आहे. सरकारवाडा पोलिसांनी त्यास शिताफीने अटक केली आहे. आज पहाटेच्या सुमारास सीबीएस परिसरात चिमुकली आढळून आली. या चिमुकलीला सोडून आपहरणकर्ता फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढला. सुरेश माणिक काळे असे जेरंबद केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने चिमुकलीचे अपहरण का केले यासह अनेक बाबींचा उलगडा त्याच्या तपासात होणार आहे. थोड्याच वेळात त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
गेल्या शनिवारी भर दिवसा म्हणजेच दुपारी २ वाजता दीड वर्षांच्या मुलीला एका भामट्याने हॉस्पिटलमधून पळवून नेले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला.
प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या दीड वर्षांच्या मुलीला भामट्याने पळवून नेले. सिव्हिल हॉस्पिटलमधील पहिल्या मजल्यावर हा प्रकार घडला होता. अपह्रत मुलीला घेऊन तिची आई व मावशी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली होती. बाळंतपणासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने मुलीची आई धावपळ करीत होती. त्याचवेळी मुलगी झोपत असल्याने आईने तिला प्रसूती कक्षाबाहेर झोपवले आणि आई पुन्हा कक्षात गेली. दुपारी दोनच्या सुमारास आई बाहेर आल्यानंतर मुलगी दिसली नाही. म्हणून आईने सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती आढळून आली नाही. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्ती मुलीला खांद्यावर झोपवून घेऊन जाताना आढळला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.
हा सर्व प्रकार सिव्हिल हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. त्याची दखल घेत पोलिसांनी कडक नाकाबंदी करीत तपास पथके विविध दिशांना पाठविली. अखेर तीन दिवसांनी अपहृत मुलगी सापडली आहे. चिमुकलीला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मुलगी मिळाल्याने तिच्या आई-वडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
बघा सीसीटीव्हीचे फोटो