मुंबई – राज्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खते व युरियाचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य शासनामार्फत दीड लाख मेट्रीक टन युरियाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
संरक्षित रासायनिक खतांबाबत असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक कृषिमंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.
राज्यात गेल्या वर्षी रासायनिक खतांचा विशेषत: युरियाचा तुटवडा जाणवला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात पुरेशी रासायनिक खते उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षी जाणवलेल्या तुटवड्यामुळे यंदा महाराष्ट्राला दोन लाख मेट्रीक टन युरिया वाढीव देण्याबाबत केंद्र शासनाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच राज्य शासनामार्फत युरियाचा दीड लाख मेट्रीक टन बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना यंदा युरियाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात सध्या रासायनिक खतांचा प्रत्यक्ष किती साठा आहे याबाबत राज्यव्यापी विशेष मोहीम घेण्याचे निर्देश कृषिमंत्री श्री.भुसे यांनी दिले. पीक पद्धतीनुसार ज्या भागात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्या प्रमाणात तेथे खतपुरवठा करण्याचे नियोजन करतानाच गेल्या दोन वर्षात राज्याच्या कुठल्या भागात जास्त प्रमाणात खताचा वापर झाला त्याचा अभ्यास करुन खतपुरवठा नियोजन करावे, असे श्री.भुसे यांनी सांगितले.