नाशिक – महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील बर्डीपाडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून दादरा, नगर हवेली या केंद्रशासित प्रदेश निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला तब्बल दीड कोटी रूपयांचा बेकायदा मद्यासाठा हस्तगत केला. या कारवाईत तीन जणांना बेड्या ठोकत पथकाने मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चार वाहने जप्त केली. ही कारवाई पुणे विभागाच्या भरारी पथकाने केली.
गिरीश पवार (२३, उंबरठाण, सुरगाणा), हेमंत मोरे (२२, बापळून, सुरगाणा) आणि शैलेश गावित (३०, सातवाकल, धरमपूर, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागात नोंदविलेल्या एका गुन्ह्यााच्या तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर सुरगाणा तालुक्यात बडीर्पाडा-परगाणा रस्त्यावरील पत्र्याच्या गोदामात छापे टाकले. या गोदामांमध्ये केंद्रशासित प्रदेशात निर्मीत आणि राज्यात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. बेकायदेशीरपणे वाहतूक करून मद्याचा साठवणूक करण्यात आल्याचे पुढे आले असून या कारवाईत तीघा संशयीतांना बेड्या ठोकत पथकाने वाहतुकीसाठी वापरलेले दोन आयशर टेम्पो, दोन चारचाकी वाहणे आणि अवैध मद्यासाठा असा सुमारे एक कोटी ४५ लाख ९३ हजार ९५३ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड, एस. व्ही. बोधे,जवान तांबळे,शेख,नेमाडे,कदम,झिंगळे आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी संशयितांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.